Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त ।

भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥

जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ।

ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥

प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात ।

आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नोकरीने ॥३॥

कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर ।

हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥

ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे ।

त्याच गांवी तयांचे । माता-बंधू राहती ॥५॥

मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित ।

ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥

एके समया पंडितांनी । स्वामीकिर्ती ऐकिली कानी ।

तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥

जरी आठ दिवसांत । मी होईन कर्जमुक्त ।

तरी दर्शना त्वरीत । अक्कलकोटी येईन ॥८॥

यासी सात दिवस झाले । काही अनुभवा न आले ।

तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥

हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करीता त्यात ।

आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥

त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती ।

सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥

हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपासी ।

फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥

तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले ।

निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥

तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक ।

तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवरी ॥१४॥

उभयतांसी ते मानले । तत्काळ तयापरी केले ।

तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥

अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला ।

हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥

पंडिते ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन ।

हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥

अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत ।

त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥

नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी ।

वार्ता ऐकुनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥

ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य ।

ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥

तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती ।

आम्ही पाहूनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥

गजानन हरीभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात ।

समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥

पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती ।

मुख पाहता नयनपाहती । न लवती तयांची ॥२३॥

तेव्हा समर्थ तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी ।

नामे दिधली त्रिवर्गासी । आणि मंत्र दिधले ॥२४॥

पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले ।

मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥

मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले ।

तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥

गुरुर्ब्रह्माः गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥

ऐसा मंत्र हरीभाऊते दिधला असे समर्थे ।

तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची ॥२७॥

दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला ।

तेव्हा तयाच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥

आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।

सर्व-देव-नमस्कारं केशवं प्रति गच्छति ॥२॥

संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन ।

एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥

इदमेव शिवम् इदमेव शिवम् ।

इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥

तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी ।

त्यांचे करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥

ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी ।

त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥

स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने ।

हरीभाऊंचे स्वामीचरणा दृढ जडले ॥३२॥

काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी ।

उभे राहून जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥

आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी ।

हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥

व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता ।

गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥

असो पुढे त्रिवर्गांनी । चांदीच्या पादुका करवोनी ।

अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥

भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी ।

माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥

चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्रींचरणी अर्पण केल्या ।

समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥

त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसपर्यंत देखा ।

पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥

हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी ।

दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥

तो समर्थे त्यांप्रती । घेवोनिया मांडीवरती ।

वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥

म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित ।

परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥

मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली ।

ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥

आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी ।

म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥

धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज ।

नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥

जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार ।

लोभ मोह अणूमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥

आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी ।

सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥

सद़्गुरुने मस्की हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत ।

धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥

सद़्गुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा ।

उपरीत झाली चित्ता । षड्विकार निमाले ॥४९॥

बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती ।

द्रव्यप्राप्तीसव निश्चिती । ढोंघ माजविती बहुत ॥५०॥

तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे ।

सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥

तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु ।

भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥

तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात ।

मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥

असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले ।

संकल्प करोनि ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥

हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता ।

ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥

म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार ।

हा नव्हे बरवा विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥

आजवर अब्रुने । दिवस काढिले आपण ।

परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥

हासतील सकल जन । धिक्कारतील पिशून ।

उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥

अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी ।

त्यागोनिया संसारसुखासी दुःखडोही का पडता ॥५९॥

संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण ।

मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥

आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी ।

त्यांची किर्ती मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥

तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी ।

तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥

माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन ।

आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥

तुम्ही म्हणाल मजसवे । तुहि घरदार सोडावे ।

मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥

तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य ।

संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥

आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन ।

हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥

कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे ।

यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥

विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर ।

आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥

ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे ।

समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥

परी तारेच्या चित्तात । षडरिपू होते जागत ।

संसाराचे मिथ्यत्व । तियेलागी कळेना ॥७०॥

आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी ।

त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥

त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणूमात्र ।

धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥

षड्विकार त्यागोनी । रमला जो स्वामींचरणी ।

दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥

स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र ।

तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥

आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते ।

त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥

कामाठीपुऱ्यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही ।

हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥

धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त ।

परी जन त्यांते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥

पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले ।

सद़्गुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥

इति श्री स्वामी चरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा भाविक परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥७९॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb