Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर ।

तेथे येऊनी स्वामीसुत । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥

षड्विकार जिंकिले । संसार त्यागिले ।

रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥

स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संस्मृती ।

कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥

स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन ।

त्याहूनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥

संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन ।

हे पाहूनी कित्येकजण । हासताती तयाते ॥५॥

परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती ।

अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥

स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी ।

तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥

मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले ।

त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥

पुत्रवात्सल्यकरोनी पाही । शोक करीत काकूबाई ।

मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥

गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी ।

अंग टाकियले धरणी । बहुत आक्रोश मांडिला ॥१०॥

निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण ।

तियेलागी सावरून । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥

तुझ्या उदरी जन्मास आलो । सद़्गुरुपायी विनटलो ।

जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥

धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी ।

मान्य जालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥

अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत ।

मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥

परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती ।

म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥

यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा करणी केली ।

याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥

त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर ।

जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥

तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती ।

ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥

ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी ।

सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥

होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन ।

म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥

ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर ।

त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥

ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाली अंतःकरणी ।

मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥

म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाऊले ।

\येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥

असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत ।

हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥

मठ होता कामाठीपुऱ्यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त ।

मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥

निःस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत ।

कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥

परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती ।

श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥

जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती ।

परी शांत चित्ते त्यांप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥

जे अहंकारे बुडाले । सत्य पथाचरण चुकले ।

नित्य कार्याते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥

ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण ।

परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥

तारा नामे त्यांची कांता । तीही त्रास देती स्वामीसुता ।

परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥

प्रथम मुंबई शहरांत । शके सतराशे त्र्याण्णवात ।

फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥

कोणे एक समयासी । नगरकर नाना रेखी ।

सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥

या नगरात सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त ।

गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥

एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी ।

मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥

पाहूनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती ।

प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥

स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी ।

धन्य झाले नाना रेखी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥

ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन ।

वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तीचे ॥३८॥

पुढे रेखीबुवांनी । स्वामींची पत्रिका करोनी ।

ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥

पत्रिका श्रीचरणी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली ।

समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥

नगारा वाजविता रेखी । हसू आले समर्थांसी ।

पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥

अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत ।

कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥

लोकापवादाचे मानी भय । तो भक्ती करील काय ।

प्रेमानंद चित्ती न होय । भजनी मन लागेना ॥४३॥

त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुती करिताती ।

खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥

असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात ।

प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥

छेली खेडे ग्रामात । प्रथम स्वामी प्रगट होत ।

विजयसिंह नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥

ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित ।

सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥

स्वामीसुत दिवसेंदिवस । स्वामीभक्ती करी विशेष ।

जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥

मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना ।

त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥

स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती ।

ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥

एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत ।

तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे ॥५१॥

राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी ।

ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥

स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न ।

ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥

मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन ।

जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आतून राणीने ॥५४॥

हा समर्थांचा निःस्सीम भक्त ।

समर्थ दर्शनाची धरीत । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥

सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसारी ।

त्या साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥

ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता ।

प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥

पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी ।

धावोनिया वेगेसी । मिळी चरणी घातली ॥५८॥

सद़्गदित अंतःकरणी । चरण क्षालिले नयनाश्रूंनी ।

देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥

बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी ।

मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥

निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी ।

कर पिरविला मुखावरूनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥

अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी ।

परी समर्थांची प्रीती खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥

त्यांत होते जे दुर्जन । ते सुताचा उत्कर्ष पाहोन ।

दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥

काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन ।

स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥

स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन ।

पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥

एके दिवशी श्री समर्थ । बैसले असता आनंदात ।

स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥

ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी ।

स्वामीसुताची हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥

बैसला असता आपण । पायी खडावा घालोन ।

हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥

परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य ।

जे सर्वांसी अलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥

आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वा भजनी ।

ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥

तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन ।

स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥

पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी ।

काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥

मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमा ।

उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥

त्यांत होते जे वैरी । ते आनंदले अंतरी ।

म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥

असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित ।

नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥

अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहु खिन्न झाला ।

परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥

स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर ।

ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥

त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमार ।

दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥

तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला ।

ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थांते ॥७९॥

स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी ।

तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीले समर्थाते ॥८०॥

म्हणे कृपा करोनिया । सुताते आणावे या ठाया ।

कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥

मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी ।

म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥

परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी ।

अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥

सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले ।

आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥

मग सांगती समर्थ । त्यासी घालोनी पेटीत ।

घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनी ॥८५॥

तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही ।

दिवसेंदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥

शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य ।

तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥

याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता ।

परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केला ॥८८॥

आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस ।

केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥

त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत ।

त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥

अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी ।

बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥

भोजनाते न उठती । धरणीवर अंग टाकिती ।

कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥

इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार ।

श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥

उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी ।

चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥

मग काकूबाईने सत्वर । जवळी केले मुंबापूर ।

तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥

निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता ।

तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥

असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही ।

परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥

सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण ।

मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥

समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी ।

संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥

पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन ।

समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥

नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ ।

केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥

उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती ।

ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥

धन्य धन्य स्वामीकुमार । उतरला भवोदधि दुस्तर ।

ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥

स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी ।

ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थांते ॥१०४॥

ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात ।

श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसि ॥१०५॥

जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला ।

विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

भाविक परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb