Skip to content
Swami Mauli Swami Mauli Swami Mauli

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Swami Mauli Swami Mauli Swami Mauli

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • स्वामी समर्थ भक्ती
  • Daily Sadhana Routine
  • Store
  • स्वामी समर्थ भक्ती
  • Daily Sadhana Routine
  • Store
Close

Search

ganapati Seva

श्री स्वामी समर्थ स्तोत्र

|| श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र — महात्म्य ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना |

गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी ||१||

नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती |

ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची ||२||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया |

स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली ||३||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन |

करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां |

स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी ||५||

नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे |

कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक ||६||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें |

तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे ||७||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं |

स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने ||८||

कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण |

आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी ||९||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण |

तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी ||१०||

मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान |

काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें |

ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी ||१२||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण |

सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने ||१३||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण |

दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें ||१४||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार |

तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र ||१५||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले |

तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात ||१६||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला |

जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या ||१७||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण |

अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या ||१८||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे |

आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां ||१९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे |

तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले ||२०||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |

गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते ||२१||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार |

अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे ||२२||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी |

भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा ||२३||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना |

शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी ||२४||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार |

कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना ||२५||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली |

जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या ||२६||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद |

झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना ||२७||

स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें |

अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें ||२८||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती |

ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना ||२९||

कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या |

कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही ||३०||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें |

कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी ||३१||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार |

अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा ||३२||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी |

म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना ||३३||

न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें |

लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी ||३४||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार |

अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी ||३५||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया |

हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी ||३६||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी |

सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती ||३७||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं |

मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं ||३८||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा |

ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं ||३९||

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी |

तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना ||४०||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी |

आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला ||४१||

अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं |

ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते ||४२||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी |

आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं ||४३||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी |

काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी ||४४||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी |

मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता ||४५||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला |

भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी ||४६||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे |

त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते ||४७||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी |

गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती ||४८||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें |

हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें ||४९||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ |

स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें ||५०||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी |

पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा ||५१||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल |

क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न ||५२||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार |

स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी ||५३||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार |

निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके ||५४||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली |

सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना ||५५||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली |

समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी ||५६||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला |

अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें ||५७||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना |

संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात ||५८||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले |

म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया ||५९||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी |

स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया ||६०||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था |

सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी ||६१||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून |

समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला ||६२||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून |

तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी ||६३||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी |

ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी ||६४||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख |

गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी ||६५||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा |

उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे ||६६||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य |

म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना ||६७||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून |

या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे ||६८||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा |

वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती ||६९||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी |

शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही ||७०||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत |

बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल ||७१||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर |

एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी ||७२||


एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती |

ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी ||७३||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न |

करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही ||७४||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: ||

मिलिंदमाधवकृत


|| ” श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र —माहात्म्य सम्पूर्ण ” ||

अर्थ जाणून घ्या (Meaning of Stotra)

Author

Swami_Sevak

Follow Me
Other Articles
Previous

श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र

Next

श्री स्वामी समर्थ स्तोत्र चा अर्थ

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb