स्वामी समर्थ स्तवन
प्रार्थना
श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥
श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामीराजाय नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा-टोपी-च-माला
दण्डकमण्डलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक
विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम् ॥ पाहि माम् ॥ पाहि माम् ॥
स्तवन
आता करूया प्रार्थना। जयजयाजी अघहरणा ।
परात्परा कैवल्यसदना। ब्रम्हानंदा यतिवर्या ।।
जयजयाजी पुराणपुरुषा। लोकपाला सर्वेशा ।
अनंत ब्रम्हांडाधीशा । वेदवंद्या जगदगुरू ।।
सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया ।
भक्तजन ताराया । अनंतरूपे नटलासी ।।
तू अग्नी तू पवन । तू आकाश तू जीवन ।
तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सुर्य तूच पै ।।
तू विष्णु आणि शंकर । तू विधाता तू इंद्र ।
अष्टदिकपालादि समग्र । तूच रूपे नटलासी ।।
कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता ।
दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ।।
जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र ।
तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ।।
असोनिया निर्गुण । रूपे नटलासी सगुण ।
ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ।।
वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रातेही नावरे ।
विष्णु शंकर एकसरे । कुंठीत झाले सर्वही ।।
मी केवळ अल्पमती । करू केवी आपुली स्तुती ।
सहस्त्रमुखही निश्चिति । शिणला ख्याती वर्णिता ।।
दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था ।
कृपा कटाक्षे दीनानाथा । दासा कडे पाहावे ।।
आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना ।
कृपा समुद्री या मीना । आश्रय देइजे सदैव ।।
पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन ।
इहलोकी सौख्य देवोन । परलोक साधन करवावे ।।
दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर ।
त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ।।
आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना ।
भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ।।
किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन ।
अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै ।।
शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो ।
सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ।।
भवदु:ख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो ।
वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ।।
सदा साधु समागम । तुझे भजन उत्तम ।
तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ।।
व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्त ।
अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ।।
आप्तवर्गाचे पोषण । न्यायमार्गावलंबन ।
इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ।।
असोनिया संसारात । प्राशीन तव नामामृत ।
प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ।।
कर्ता आणि करविता । तूची एक स्वामिनाथा ।
माझिया ठायी वार्ता । मीपणाची नसेची ।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः॥