Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना ।

जयजयाजी परमपावना । दीनबंधा जगद़्गुरु ॥१॥

आपुल्या कृपे करोन । त्रयोदश अध्यायपर्यंत ।

वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे वदवावे ॥२॥

आपुल्या कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया ।

चरित्र ऐकोनी श्रोतया । संतोष होवो बहुसाळ ॥३॥

कैसी करावी आपुली भक्ती । हे नेणे मी मंदमती ।

परी प्रश्न करिता श्रोती । अल्पमती सांगतसे ॥४॥

प्रातःकाळी उठोन । आधी करावे नामस्मरण ।

अंतरी ध्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥५॥

प्रातःकर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी ।

भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त ॥६॥

एकाग्र करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान ।

सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसुमे अर्पावी ॥७॥

धूप-दीप-नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध ।

अर्पावे नाना खाद्य । नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥८॥

षोडशोपचारे पूजन । करावे सद़्भावे करुन ।

धूप-दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥९॥

जोडोनिया दोन्ही कर । उभे रहावे समोर ।

मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र श्रेष्ठ पै ॥१०॥

आजानुबाहु सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान ।

भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥११॥

मग करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा ।

परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या ॥१२॥

जयजयाजी पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा ।

अनंत ब्रह्मांडधीशा । वेदवंद्या जगद़्गुरु ॥१३॥

सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया ।

भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१४॥

तू अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन ।

तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥१५॥

तू विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र ।

अष्टदिक्पालादि समग्र । तूच रुपे नटलासी ॥१६॥

कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता ।

दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१७॥

जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र ।

तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१८॥

असोनिया निर्गुण । रुपे नटलासी सगुण ।

ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१९॥

वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे ।

विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि ॥२०॥

मी केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती ।

सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती वर्णिता ॥२१॥

दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था ।

कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे ॥२२॥

आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना ।

कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे सदैव ॥२३॥

पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन ।

इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२४॥

दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर ।

त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ॥२५॥

आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना ।

भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ॥२६॥

किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन ।

अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै ॥२७॥

शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो ।

सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२८॥

भवदुःख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो ।

वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२९॥

सदा साधु-समागम । तुझे भजन उत्तम ।

तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥३०॥

व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्ता ।

अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ॥३१॥

आप्तवर्गाचे पोषण । न्याय मार्गावलंबन ।

इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ॥३२॥

असोनिया संसारात । प्राशीन तव ज्ञानामृत ।

प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥३३॥

ऐशी प्रार्थना करिता । आनंद होय समर्था ।

संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३४॥

गुरुवार उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन ।

प्रदोषसमय होता जाण । उपोषण सोडावे ॥३५॥

तेणे वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी ।

अनुभवाची प्रसिद्धि । करिताती स्वामीभक्त ॥३६॥

श्री स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र ।

प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ पाविजे ॥३७॥

ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी ।

स्त्रियांनीही निशिदिनी । जप याचा करावा ॥३८॥

प्रसंगी मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था ।

स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष जातील ॥३९॥

कैसी करावी स्वामीभक्ती । हे नेणे मी मंदगती ।

परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती श्रेष्ठ पै ॥४०॥

आम्ही आहो स्वामीभक्त । मिरवू नये लोकांत ।

जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ । निष्फळ भक्ती तयाची ॥४१॥

दंभे षोडशोपचारे । ते प्रिय नव्हेचि समर्था ।

बावे पत्र-पुष्प अर्पिता । समाधान स्वामीते ॥४२॥

जयजयाजी आनंदकंदा । जयजयाजी करुणासमुद्रा ।

विष्णू शंकराचिया छंदा । कृपा करोनी पुरवावे ॥४३॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा ऐकोत भाविक भक्त । चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥४४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb