Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

शुक्लपक्षीचा शशिकर । वाढे जैसा उत्तरोत्तर ।

तैसे हे स्वामी चरित्र । अध्यायाध्यायी वाढले ॥१॥

द्वादशाध्यायाचे अंती । श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती ।

कपट युक्तीने फसवू पाहती । परी झाले व्यर्थची ॥२॥

खिन्न झाला चोळप्पा । म्हणे श्रींची पूर्ण कृपा ।

मजहुनी तया बाळाप्पा । प्रिय असे जाहला ॥३॥

वर्तले ऐसे वर्तमान । बाळाप्पा एकनिष्ठा धरोन ।

स्वामीसेवा रात्रंदिन । अत्यानंदे करितसे ॥४॥

स्वयंपाकादिक करावयासी । लज्जा वाटतसे तयासी ।

तयाते एके समयासी । काय बोलती समर्थ ॥५॥

निर्लज्जासी सन्निध गुरु । असे जाण निरंतरु ।

ऐसे बोलता सद़्गुरु । बाळाप्पा मनी समजला ॥६॥

अनेक उपाये करोन । शुद्ध केले बाळाप्पाचे मन ।

स्वामीविणे दैवत अन्य । नसेचि थोर या जगी ॥७॥

सेवेकऱ्यांमाजी वरिष्ठ । सुंदराबाई होती तेथ ।

तिने सेवेकऱ्यास नित्य । त्रास द्यावा व्यर्थची ॥८॥

नाना प्रकारे बोलोन । करी सर्वांचा अपमान ।

परी बाळाप्पावरी पूर्ण । विश्वास होता तियेचा ॥९॥

परी कोणे एके दिवशी । मध्यरात्रीच्या समयासी ।

लघुशंका लागता स्वामींसी । बाळाप्पाते उठविले ॥१०॥

श्रींते धरोनिया करी । घेउनी गेले बाहेरी ।

पाहोनिया ऐशी परी । बाई अंतरी कोपली ॥११॥

म्हणे याने येवोन । स्वामी केले आपणा आधीन ।

माझे गेले श्रेष्ठपण । अपमान जाहला ॥१२॥

तैपासूनी बाळाप्पासी । त्रास देत अहर्निशी ।

गाऱ्हाणे सांगता समर्थांसी । बाईते शब्दे ताडिती ॥१३॥

अक्कलकोटी श्रीसमर्थ । प्रथमतः ज्याचे घरी येत ।

चोळाप्पा विख्यात । स्वामीभक्त जाहला ॥१४॥

एक तपपर्यंत । स्वामीसेवा तो करीत ।

तयासी द्रव्याशा बहुत । असे सांप्रत लागली ॥१५॥

दिवाळीचा सण येत । राजमंदिरामाजी समर्थ ।

राहिले असता आनंदात । वर्तमान वर्तले ॥१६॥

कोण्या भक्ते समर्थांसी । अर्पिले होते चंद्रहारासी ।

सणानिमित्त त्या दिवशी । अंगावरी घालावा ॥१७॥

राणीचिये मनांत । विचार येता त्वरित ।

सुंदराबाईसी लोबत । चंद्रहार द्यावा की ॥१८॥

सुंदराबाई बोलली । तो आहे चोळप्पाजवळी ।

ऐसे ऐकता त्या काळी । जमादार पाठविला ॥१९॥

गंगुलाल जमादार । चोळाप्पाजवळी ये सत्वर ।

म्हणे द्यावी जा चंद्रहार । राणीसाहेब मागती ॥२०॥

चोळाप्पा बोले तयांसी । हार नाही आम्हापासी ।

बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ॥२१॥

ऐसे ऐकुनी सत्वर । गंगुलाल जमादार ।

बाळाप्पाजवळी येउनी सत्वर । हार मागू लागला ॥२२॥

बाळाप्पा बोले सत्वर । आपणापासी चंद्रहार ।

परी चोळप्पाची त्यावर । सत्ता असे सर्वस्वे ॥२३॥

ऐसे ऐकुनी बोलणे । जमादार पुसे चोळाप्पाकारणे ।

जबाब दिधला चोळप्पाने । बाळाप्पा देती तरी घेईजे ॥२४॥

ऐसे भाषण ऐकोन । जमादार परतोन ।

नृपमंदिरी येवोन । वर्तमान सर्व सांगे ॥२५॥

चोळाप्पाची ऐकुन कृती । राग आला राणीप्रती ।

सुंदराबाईनेही गोष्टी । तयाविरुद्ध सांगितल्या ॥२६॥

कारभार चोळाप्पाचे करी । जो होता आजवरी ।

तो काढूनी तयास दूरी । करावे राणी म्हणतसे ॥२७॥

पहिलेच होते बाईच्या मनी । साहाय्य झाली आता राणी ।

सुंदराबाईचा गगनी । हर्ष तेव्हा न समावे ॥२८॥

चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी ।

धनप्राप्ती तया भारी । समर्थकृपेने होतसे ॥२९॥

असो एके अवसरी । काय झाली नवलपरी ।

बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टीत ॥३०॥

एक वस्त्र तया वेळी । पडले होते श्रींजवळी ।

तयाची करोनिया झोळी । समर्थे करी घेतली ॥३१॥

अल्लख शब्द उच्चारिला । म्हणती भिक्षा द्या आम्हाला ।

तया वेळी सर्वत्राला । आश्चर्य वाटले ॥३२॥

झोळी घेतली समर्थे । काय असे उणे तेथे ।

जे जे दर्शना आले होते । त्यांनी भिक्षा घातली ॥३३॥

कोणी एक कोणी दोन । रुपये टाकती आणोन ।

न लागता एक क्षण । शंभरावर गणती झाली ॥३४॥

झोळी चोळाप्पाते देवोन । समर्थ बोले काय वचन ।

चोळाप्पा तुझे फिटले रीण । स्वस्थ आता बसावे ॥३५॥

पाहोनिया द्रव्यासी । आनंद झाला तयासी ।

परी न आले मानसी । श्रीचरण अंतरले ॥३६॥

तयासी झाले मास दोन । पुढे काय झाले वर्तमान ।

राणीच्या आज्ञेने शिपाई दोन । स्वामीजवळी पातले ॥३७॥

त्यांनी उठवून चोळाप्पासी । आपण बैसले स्वामीपाशी ।

चोळाप्पाच्या मानसी । दुःख फार जाहले ॥३८॥

स्वामीपुढे वस्तु येती । त्या शिपाई उचलिती ।

चोळाप्पाते काही न देती । ने तरी घेती हिरावोनी ॥३९॥

चोळाप्पासी दूर केले । बाईसी बरे वाटले ।

ऐसे काही दिवस गेले । बाळाप्पा सेवा करिताती ॥४०॥

कोणे एके अवसरी । सुंदराबाई बाळाप्पावरी ।

रागावोनी दृष्टोत्तरी । ताडण करी बहुसाळ ॥४१॥

ते ऐकोनी बाळाप्पासी । दुःख झाले मानसी ।

सोडून स्वामीचरणांसी । म्हणती जावे येथोनी ॥४२॥

ऐसा केला विचार । जाहली असता रात्र ।

बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर । खिन्न झाले मानसी ॥४३॥

आज्ञा समर्थांची घेवोनी । म्हणती जावे येथोनी ।

याकरिता दुसरे दिनी । समर्थांजवळी पातले ॥४४॥

आपुली आज्ञा घ्यावयासी । बाळाप्पा येतो या समयासी ।

अंतर्ज्ञानी समर्थांसी । तत्काळ विदित जाहले ॥४५॥

तेव्हा एक सेवेकऱ्यांस । बोलले काय समर्थ ।

बाळाप्पा दर्शनासी येत । त्यासी आसन दाखवावे ॥४६॥

बाळाप्पा येता त्या स्थानी । आसन दाविले सेवेकऱ्यांनी ।

तेव्हा समजले निजमनी । आज्ञा आपणा मिळेना ॥४७॥

कोठे मांडावे आसन । विचार पडला त्यालागून ।

तो त्याच रात्री स्वप्न । बाळाप्पाने देखिले ॥४८॥

श्रीमारुतीचे मंदिर । स्वप्नी आले सुंदर ।

तेथे जाउनी सत्वर । आसन त्यांनी मांडिले ॥४९॥

श्रीस्वामी समर्थ । या मंत्राचा जप करीत ।

एक वेळ दर्शना येत । हिशेब ठेवीत जपाचा ॥५०॥

काढूनी दिले बाळाप्पासी । आनंद झाला बाईसी ।

गर्वभरे ती कोणासी । मानीनाशी जाहली ॥५१॥

सुंदराबाईसी करावे दूर । समर्थांचा झाला विचार ।

त्याप्रमाणे चमत्कार । करोनिया दाविती ॥५२॥

जे कोणी दर्शना येत । त्यांसी बाई द्रव्य मागत ।

धन-धान्य साठवीत । ऐशा प्रकारे करोनी ॥५३॥

बाईची कृत्ये दरबारी । विदित केली थोर थोरी ।

बाईनी रहावे दूरी । श्रींचरणापासून ॥५४॥

परी राणीची प्रिती । बाईवरी बहू होती ।

याकारणे कोणाप्रती । धैर्य काही होईना ॥५५॥

अक्कलकोटी त्या अवसरी । माधवराव बर्वे कारभारी ।

तयांसी हुकूम झाला सत्वरी । बाईसी दूरी करावे ॥५६॥

परी राणीस भिवोनी । तैसे न केले तयांनी ।

समर्थ दर्शनासी एके दिनी । कारभारी पातले ॥५७॥

तयांसी बोलती समर्थ । कैसा करिता कारभार ।

ऐसे ऐकोनिया उत्तर । बर्वे मनी समजले ॥५८॥

मग त्यांनी त्याच दिवशी । पाठविले फौजदारासी ।

कैद करुनिया बाईसी । आणावी म्हणती सत्वर ॥५९॥

आज्ञेप्रमाणे सत्वर । बाईसी बांधी फौजदार ।

बाई करी शोक फार । घेत ऊर बडवूनी ॥६०॥

फौजदारासी समर्थ । काही एक न बोलत ।

कारकीर्दीचा अंत । ऐसा झाला बाईचा ॥६१॥

स्वामीचिया सेवेकरिता । सरकारांतूनी तत्त्वता ।

पंच नेमूनी व्यवस्था । केली असे नृपराये ॥६२॥

मग सेवा करावयासी । घेउनी गेले बाळाप्पासी ।

म्हणती देऊ तुम्हांसी । पगार सरकारांतूनी ॥६३॥

बाळाप्पा बोलले तयांसी । द्रव्याशा नाही आम्हांसी ।

आम्ही निर्लोभ मानसी । स्वामीसेवा करु की ॥६४॥

बाळाप्पाचा जप होता पूर्ण । एका भक्तास सांगोन ।

करविले श्रींनी उद्यापन । हिशेब जपाचा घेतला ॥६५॥

बाळाप्पांनी चाकरी । एक तप सरासरी ।

केली उत्तम प्रकारी । समर्था ते प्रिय जाहले ॥६६॥

अक्कलकोट नगरात । अद्यापि बाळाप्पा रहात ।

श्रीपादुकांची पूजा करीत । निराहार राहोनी ॥६७॥

जे जे झाली स्वामीभक्त । त्यात बाळाप्पा श्रेष्ठ ।

तयावरी श्री समर्थ । करीत होते प्रेम बहू ॥६८॥

ऐसे बाळाप्पाचे चरित्र । वर्णिले असे संकलित ।

स्वामी चरित्र सारामृत । चरित्रसार घेतले ॥६९॥

दृढनिश्चय आणि भक्ती । तैसी सद़्गुरुचरणी आसक्ति ।

तेणे येत मोक्ष हाती । अन्य साधने व्यर्थची ॥७०॥

दृढनिश्चयाचे उदाहरण । हे चरित्र असे पूर्ण ।

श्रोती होउनी सावधान । श्रवणी आदर धरावा ॥७१॥

उगीच करिती दांभिक भक्ती । त्यावरी स्वामी कृपा न करिती ।

सद़्भावे जे नमस्कारिती । त्यावरी होती कृपाळू ॥७२॥

पुढले अध्यायी सुंदर कथा । ऐका श्रोते देऊनी चित्ता ।

जेणे निवारे सर्व व्यथा । पापराशी दग्ध होती ॥७३॥

अक्कलकोटनिवासिया । जयजयाजी स्वामीराया ।

रात्रंदिन तुझ्या पाया । विष्णू शंकर वंदिती ॥७४॥

इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा भक्त परिसोत । त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥७५॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb