Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

करावया जगदुद्धार । हरावया भूभार ।

वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥

भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त ।

यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥

गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी ।

पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद पोटी नच मावे ॥३॥

त्या दिवशी श्री समर्थ । होते खासबागेत ।

यात्रा आली बहुत । गर्दी झाली श्रींजवळी ॥४॥

बाळाप्पाचे मानसी । तेव्ही चिंता पडली ऐशी ।

ऐशा गर्दीत आपणासी । दर्शन कैसे होईल ॥५॥

परी दर्शन घेतल्याविण । आज करु नये भोजन ।

बाळाप्पाचे तनमन । स्वामीचरणी लागले ॥६॥

दर्शनेच्छा उत्कट चित्ती । खडीसाखर घेवोनी हाती ।

गर्दीमाजी प्रवेश करिती । स्वामी सान्निध पातले ॥७॥

आजानुबाहू सुहास्यवदन । श्रीस्वामीमूर्ती पाहोन ।

बाळाप्पाने धावोन । दृढ चरण धरियेले ॥८॥

कंठ सद़्गदित जाहला । चरणी भाळ ठेविला ।

क्षणैक मीपण विसरला । परम तोषला मानसी ॥९॥

गंगा मिनली सागरी । जैसे तरंग जलाभीतरी ।

तैसे बाळाप्पा ते अवसरी । स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥

मधुस्तव भ्रमर जैसा । कमलपुष्प न सोडी सहसा ।

स्वामीचरणी बाळाप्पा तैसा । दृढ जडला स्वभावे ॥११॥

येवोनिया भानावरती । श्रीचरणांची सोडिली मिठी ।

ब्रह्मानंद न मावे पोटी । स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥

श्री स्वामी समर्थ त्या वेळी । पडले होते भूतळी ।

उठोनिया काय केली । लीला एक विचित्र ॥१३॥

सर्व वृक्षांसी आलिंगन । दिले त्यांनी प्रेमेकरोन ।

बाळाप्पावरचे प्रेम । ऐशी कृतीने दाविले ॥१४॥

धन्यता मानोनी मनी । बाळाप्पा निघाले तेथोनी ।

परी तयांचे श्रीचरणी । चित्त गुंतले अखंड ॥१५॥

त्यासवे एक जहागिरदार । ते होते बिऱ्हाडावर ।

स्वयंपाक करोनी तयार । म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥

बाळाप्पा दर्शन करोन । आले बिऱ्हाडी परतोन ।

जहागिरदारे नैवेद्य काढोन । बाळाप्पा हाती दिधला ॥१७॥

म्हणती जाउनी स्वामींसी । अर्पण करा नैवेद्यासी ।

अवश्य म्हणोनी तयांसी । बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥

म्हणती नैवेद्य दाखवून । मग करु प्रसाद भक्षण ।

मार्गी तयांसी वर्तमान । विदीत एक जाहले ॥१९॥

या समयी श्री समर्थ । असती नृप मंदिरात ।

राजाज्ञेवाचूनी तेथ । प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥

ऐसे ऐकूनी वर्तमान । बाळाप्पा मनी झाले खिन्न ।

म्हणती आज नैवेद्यार्पण । आपल्या हस्ते नोहेची ॥२१॥

मार्गावरुनी परतले । सत्वर बिऱ्हाडावरती आले ।

तेथे नैवेद्यार्पण केले । मग सारिले भोजन ॥२२॥

नित्य प्रातःकाळी उठोन । षट्कर्मांते आचरोन ।

घेवोनी स्वामी दर्शन । जपालागी बैसावे ॥२३॥

श्री शंकर उपास्य दैवत । त्याचे करावे पूजन नित्य ।

माध्यान्ही येता आदित्य । जपानुष्ठान आटपावे ॥२४॥

करी झोळी घेवोनी । श्री स्वामींजवळी येवोन ।

मस्तक ठेवोनी चरणी । जावे भिक्षेकारणे ॥२५॥

मागोनिया मधुकरी । मग यावे बिऱ्हाडावरी ।

जी मिळेल भाजीभाकरी । त्याने पोट भरावे ॥२६॥

घ्यावे स्वामी दर्शन । मग करावे अनुष्ठान ।

ऐशा प्रकारे करोन । अक्कलकोटी राहिले ॥२७॥

चोळाप्पा आदीकरोन । सेवेकरी बहुतजण ।

त्यांत सुंदराबाई म्हणून । मुख्य होती त्या वेळी ॥२८॥

आपण व्हावे सेवेकरी । इच्छा बाळाप्पाचे अंतरी ।

सुंदराबाईचिये करी । आधिपत्य सर्व असे ॥२९॥

एके दिवशी तयासी । बाई आज्ञा करी ऐशी ।

आपणही श्रीसेवेसी । करीत जावे आनंदे ॥३०॥

बाळाप्पा मनी आनंदला । म्हणे सुदिन आज उगवला ।

सद़्गुरुसेवेचा लाभ झाला । जाहले सार्थक जन्माचे ॥३१॥

बहुत जण सेवेकरी । बाई मुख्य त्यांमाझारी ।

सर्व अधिकार तिच्या करी । व्यवस्थेचा होता पै ॥३२॥

मी प्रिय बहु स्वामींसी । ऐसा अभिमान तियेसी ।

गर्वभरे इतरांसी । तुच्छ मानू लागली ॥३३॥

या कारणे आपसात । भांडणे होती सदोदित ।

स्वामीसेवेची तेथ । अव्यवस्था होतसे ॥३४॥

हे बाळाप्पांनी पाहोन । नाना युक्ती योजून ।

मोडुनि टाकिले भांडण । एकचित्त सर्व केले ॥३५॥

कोठेही असता समर्थ । पूजादिक व्हावया यथार्थ ।

तत्संबंधी सर्व साहित्य । बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥

समर्थांच्या येता चित्ती । अरण्यांतही वस्ती करिती ।

परी तेथेही पूजा आरती । नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥

बाळाप्पांची प्रेमळ भक्ती । पाहुनी संतोष स्वामीप्रती ।

दृढ भाव धरुनी चित्ती । सेवा करिती आनंदे ॥३८॥

ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास ।

व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥

बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र ।

तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥

भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून ।

पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥

पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण ।

विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥

स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी ।

सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥

आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी ।

तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥

प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी ।

मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥

हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी ।

आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥

तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती ।

परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥

बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण ।

हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥

पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य ।

यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥

एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून ।

न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥

तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली ।

ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥

समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात ।

तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥

स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन ।

ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥

त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती ।

बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥

तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार ।

बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥

श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी ।

दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥

आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान ।

ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥

बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन ।

करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥

स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी ।

परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥

श्रीपादभट्टे एके दिवशी । विचारले समर्थांसी ।

कुलदेवतेच्या दर्शनासी । जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥

ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत ।

कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥

तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला ।

मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥

तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण ।

श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥

म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी ।

तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥

तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी ।

दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥

चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी ।

येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥

भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला ।

महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥

स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती ।

कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥

जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम ।

विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥

इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb