Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतितमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा ।

भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥

लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता ।

विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥

तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद ।

परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥

तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन ।

निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥

तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत ।

तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥

वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन ।

सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥

अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला ।

उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥

असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी ।

गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥

करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती ।

तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥

फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना ।

पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥

गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने ।

फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥

फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती ।

तेव्हा समर्थ आज्ञापिती । गृहस्थाचे सत्वर ॥१२॥

शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण ।

परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥

म्हणे यवन याती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट ।

यातीमध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥

आला मनी ऐसा विचार । तो समर्थांस कळला सत्वर ।

म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥

इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक ।

येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥

दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन ।

द्रव्य मिळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥

त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरीत ।

तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥

त्यासी बोलले समर्थ । तु मुंबापुरी जाई त्वरीत ।

सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥

स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ मुंबईस आला ।

उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥

प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ निघाला फिरायासी ।

येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥

तो घरातून एक वृद्ध बाई । दार उघडोन घाईघाई ।

बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥

तिने बोलाविले त्याला ।

आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥

गृहस्थ मनी आनंदला । बाईते आशिर्वाद दिधला ।

द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवरी सत्वर ॥२४॥

समर्थांचे वचन सत्य । गृहस्था आली प्रचित ।

वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गात स्वामींचे ॥२५॥

समर्थांची लीला विचित्र । केवी वंदू शके मी पामर ।

ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित जाले कविराज ॥२६॥

कोणी दाता नृपवर । दान कराया भांडार ।

मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥

षड्रस अन्नाचे ढीग पडले । क्षुधित जन तेथे आले ।

त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥

स्वामीचरित्र भांडारातून । रत्ने घेतली निवडोन ।

प्रेमादरे माळ करुन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥

श्री स्वामीचरणसरोजी । विष्णुभ्रमर घाली रुंजी ।

अत्यादरे चरण पूजी । शंकर स्तोत्र प्रेमे गातसे ॥३०॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा ऐकोत भाविक भक्त । विशंतितमोऽध्याय गोड हा ॥३१॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत एकोनविंशोध्याय ।

Next

। श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb