Skip to content
  • स्वामी सेवा
  • गणेश अथर्वशीर्ष
  • Account
  • मंत्र
  • स्तोत्र
Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

Ebook - Store Ebook - Store Ebook - Store

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • Daily Sadhana Routine
  • Daily Sadhana Routine
Close

Search

तुमच्यासाठी काहीतरी तयार होत आहे.
Swami Seva

। श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे ।

कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाली म्हणती त्या ॥१॥

स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत ।

करोनी माझे मुख निमित्त । वदले श्रीस्वामीराज ॥२॥

आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा ।

हा ग्रंथ संपूर्ण करावा । भक्तजनांकारणे ॥३॥

संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता ।

जडदेह त्यागोनी तत्त्वता । गेले स्वस्थानी यतिराज ॥४॥

शके अठराशे पूर्ण । संवत्सर बहुधान्य ।

मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ॥५॥

दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहराचा अवसर ।

चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥

षट्चक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदोन ।

आत्मज्योत निघाली पूर्ण । हृदयामधुनी तेधवा ॥७॥

जवळ होते सेवेकरी । त्यांच्या दुःख झाले अंतरी ।

शोक करिता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥

अक्कलकोटीचे जन समस्त । दुःखे करून आक्रंदन ।

तो वृतान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥

असो स्वामींच्या लीला । जना सन्मार्ग दाविला ।

उद्धरिले जडमुढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥

कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी ।

पालशेत ग्रामामाझारी । जन्म माझा झालासे ॥११॥

श्रेष्ठ चित्तपावन जातीत । उपनाम असे थोरात ।

बळवंत पार्वतीसुत । नाम माझे विष्णु असे ॥१२॥

तेथेचि बालपण गेले । आता कोपरलीस येणे केले ।

उपशिक्षक पद मिळाले । विद्यालयी सांप्रत ॥१३॥

वाणी मारवाडी श्रेष्ठ । नाम ज्यांचे शंकरशेट ।

त्यांसी स्नेह झाला निकट । आश्रयदाते ते माझे ॥१४॥

त्यांची स्वामीचरणी भक्ती । भावार्थे पूजन करिती ।

धिंवसा उपजली चित्ती । स्वामीचरित्र श्रवणाची ॥१५॥

ते मजला सांगितले । मी स्वामी गुणानुवाद गाइले ।

हे स्वामी चरित्र लिहिले । अल्प मतीने अत्यल्प ॥१६॥

शब्द सोपे व्यावहारिक भाषा । प्रत्येक अध्याय लहानसा ।

आबालवृद्धा समजे असा । लघु ग्रंथ रचिला हा ॥१७॥

प्रथमाध्यायी मंगलाचरण । कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन ।

आधार स्वामीचरित्रास कोण । हेचि कथन केलेसे ॥१८॥

श्रीगुरु कर्दळीवनातूनी निघाले । स्वामीरुपे प्रगटले ।

भुवरी प्रख्यात झाले । हे कथन द्वितीयाध्यायी ॥१९॥

तारावया भक्तजनाला । अक्कलकोटी प्रवेश केला ।

तेथीचा महिमा वर्णिला । तृतीयाध्यायी निश्चये ॥२०॥

स्वामींचा करावया छळ । आले दोन संन्यासी खल ।

तेचि वृत्त सकल । चवथ्यामाजी वर्णिले ॥२१॥

मल्हारराव राजा बडोद्यासी । त्याने न्यावया स्वामींसी ।

पाठविले कारभाऱ्यांसी । पाचव्यांत ते कथा ॥२२॥

यशवंतराव सरदार । त्यासी दाविला चमत्कार ।

तयांचे वृत्त समग्र । सहाव्यात वर्णिले ॥२३॥

विष्णुबुवा ब्रह्मचारी । त्यांची स्वामीचरणांवरी ।

भक्ती जडली कोण्याप्रकारी । ते सातव्यांत सांगितले ॥२४॥

शंकर नामे एक गृहस्थ । होता ब्रह्मसमंधे ग्रस्त ।

त्यासी केले दुःखमुक्त । आठव्यात ते कथा ॥२५॥

खर्चोनिया द्रव्य बहुत । त्यांनी बांधिला सुंदर मठ ।

ते वर्णन समस्त । नवव्यात केलेसे ॥२६॥

चिदंबर दीक्षितांचे वृत्त । वर्णिले दशमाध्यायात ।

ते ऐकता पुनीत । श्रोते होती सत्यचि ॥२७॥

अकरावा आणि बारावा । तैसाचि अध्याय तेरावा ।

बाळाप्पाचा इतिहास बरवा । त्यामाजी निरुपिला ॥२८॥

भक्तिमार्ग निरुपण । संकलित केले वर्णन ।

तो चवदावा अध्याय पूर्ण । सत्तारक भाविका ॥२९॥

बसाप्पा तेली सद़्भक्त । तो कैसा झाला स्वामीभक्त ।

त्याची कथा गोड बहुत । पंधराव्यात वर्णिली ॥३०॥

हरीभाऊ मराठे गृहस्थ । कैसे झाले स्वामीभक्त ।

सोळा सतरा यांत निश्चित । वृत्त त्यांचे वर्णिले ॥३१॥

स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू । त्यासी लागला भजनछंदू ।

जे दादाबुवा प्रसिद्धु । अठराव्यात वृत्त त्यांचे ॥३२॥

वासुदेव फडक्यांची गोष्ट । आणि तात्यांचे वृत्त ।

वर्णिले एकोणविसाव्यांत । सारांशरुपे सत्य पै ॥३३॥

एक गृहस्थ निर्धन । त्यासी आले भाग्य पूर्ण ।

तेचि केले वर्णन । विसाव्यांत निर्धारे ॥३४॥

स्वामी समाधिस्त झाले । एकविसाव्यांत वर्णिले ।

ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले । पूर्ण केले स्वामीचरित्र ॥३५॥

शके अठराशे एकोणवीस । वसंतऋतू चैत्र मास ।

गुरुवार वद्य त्रयोदशीस । पूर्ण केला ग्रंथ हा ॥३६॥

बळवंत नामे माझा पिता । पार्वती माता पतिव्रता ।

वंदोनी त्या उभयंता । ग्रंथ समाप्त केलासे ॥३७॥

स्वामींनी दिधला हा वर । जो भावे वाचील हे चरित्र ।

त्यासी आयुरारोग्य अपार । संपत्ती, संतति प्राप्त होय ॥३८॥

त्याची वाढो विमल किर्ती । मुखी वसो सरस्वती ।

भवसागर तरोन अंती । मोक्षपद मिळो त्या ॥३९॥

अंगी सर्वदा विनय असो । वृथाभिमान तो नसो ।

सर्व विद्यासागर गवसो । भक्तश्रेष्ठा लागूनी ॥४०॥

ज्या कारणे ग्रंथ रचिला । जिही प्रसिद्धीस आणिला ।

त्यांसी रक्षावे दयाळा । कृपाघना समर्था ॥४१॥

मी केवळ मतिमंद । परी भावे घेतला छंद ।

कृपाळू तू सच्चिदानंद । पूर्ण केला दयाळुवा ॥४२॥

दोन्ही कर जोडोनी । आता हेचि विनवणी ।

ग्रंथसंरक्षकांलागोनि । सुखी ठेवी दयाळा ॥४३॥

आता ज्ञानी वाचक असती । त्यांस करु एक विनंती ।

मी केवळ हीनमति । कवित्व करू नेणेची ॥४४॥

परी माझी ही आर्त उत्तरे । वाचावी ऐकावी आदरे ।

उबग न मानावा चतुरे । स्वामीचरित्र म्हणोनी ॥४५॥

जयजयाजी परमानंदा । वैकुंठवासी श्रीगोविंदा ।

भक्ततारका आनंदकंदा । अनामातीता अभेदा ॥४६॥

अरिमर्दना सर्वेशा । विश्वंभरा अविनाशा ।

पुराणपुरुषा अनंतवेशा । भवपाशा सोडवी ॥४७॥

जयजयाजी कमलासना । कमलावरा कमलनयना ।

विधिताता कमलवदना । हृदयकमली वसावे ॥४८॥

मत्स्य कूर्म वराह जाण । नृसिंह आणि वामन ।

परशुराम दशरथनंदन । कृष्ण बौद्ध कलंकी तू ॥४९॥

स्वामीचरित्र सुंदर उद्यान । त्यातील कुसुमे वेचून ।

सुंदर माळ करोन । आला घेवोनि विष्णु कवि ॥५०॥

आपुल्या कंठी तात्काळ । घालोनि चरणी ठविला भाल ।

सदोदित याचा प्रतिपाल । करावा बाळ आपुले ॥५१॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।

सदा परिसोत भाविक भक्त । एकविंशोऽध्याय गोड हा ॥५२॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Author

Admin_ajinkya

Follow Me
Other Articles
Previous

। श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतितमोध्याय ।

Copyright 2026 — स्वामीमाऊली.com. All rights reserved. सर्वेशा एंटरप्राइजेस अंतर्गत अधिकृत

Website security powered by MilesWeb