श्री स्वामी समर्थ अष्टक
असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला | समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||
मला माय न बाप न आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||
नसे शास्त्र विद्या कलादीक काही | नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा | तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||
मला काम क्रोधाधिकी जागविले | म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई | तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||
कधी गोड वाणी न येई मुखाला | कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||
मला एवढी घाल भीक्षा समर्था | मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||
|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||